शबनम न्यूज | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे घाटात आज सकाळी विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून संरक्षक कठडा तोडत खाली कोसळली. या अपघातात अनेक शाळकरी विद्यार्थी जखमी झाले असून, घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही बस चौफुल्याकडून सुप्याच्या दिशेने विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. सुपे घाटातील एका वळणावर अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने रस्त्यालगतचा संरक्षक कठडा तोडला आणि घाटाच्या बाजूला खाली कोसळली.
बस उलटल्यानंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
जखमी विद्यार्थ्यांवर योग्य आणि तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. अपघाताच्या पार्श्वभूमीवर बस चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे.










Total Users : 223133