शबनम न्यूज | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम पाटोदा येथे झाला. मात्र, गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, पाटोद्यात डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
पाटोद्यात रात्री दोनच्या सुमारास जरांगे पाटील पोहोचले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच हजारो मराठा बांधवांनी पाटोदा चौकात गर्दी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाशी संवाद साधला. रात्री उशिरापर्यंत, सुमारे अडीच वाजेपर्यंत त्यांची सभा सुरू होती.
दरम्यान, प्रकृती चिंताजनक असतानाही जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पाटोद्यातून पुढील प्रवासाला निघताना त्यांनी भावनिक आवाहन केले. “रोज माझं असं झालं तर मी आठ दिवसांत मरून जाईन. मला मुंबईत जाऊन मरू द्या,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. समाजाच्या कल्याणासाठी एक बळी द्यावा लागेल, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने उपस्थित मराठा बांधव भावूक झाले.
गेल्या १९ दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. त्यातच त्यांनी सलाईन लावून घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सभा संपल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास जरांगे पाटील यांचे वडील रावसाहेब जरांगे पाटोद्यात पोहोचले. मुलाची प्रकृती खालावल्याने चिंतेत असलेल्या वडिलांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. रावसाहेब जरांगे भावूक झाल्याचेही दिसून आले.
दरम्यान, प्रकृतीची चिंता असतानाही जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे. आता १९ सप्टेंबरच्या आंदोलनाकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










Total Users : 223127