विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात – आमदार शंकर जगताप
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम करतात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम हे कोणत्याही खासगी शाळेतील उपक्रमांपेक्षा कमी नाहीत. आज महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. महापालिकेतील शिक्षकांनी देखील आपल्या कार्यातून महापालिका शाळांकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात केले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई पठारे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह शिक्षण समिती सदस्य व नगरसदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ३८ जणांचा आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. महापालिकेचा सर्वांत महत्त्वाचा विभाग म्हणजे शिक्षण विभाग आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुजाण नागरिक घडविण्याचे काम प्रत्येक शिक्षक करतात. सुजाण नागरिक घडविताना विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच विद्यार्थ्यांमधील चांगले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणारा घटक नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी केले.
विविध विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव
शिक्षक दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आदर्श बालवाडी शिक्षिका पुरस्काराने वंदना पराते, संगीता इंगळे आणि राजश्री वाळुंज यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक – प्राथमिक विभाग या पुरस्काराने सुरेखा कुंजीर, वीणा दाभाडे, मनीषा पिंगळे, राजश्री रासकर, योगेश्वरी लोणकर, ज्योती गिरी, सविता कांबळे, सुनीता बामणे, सुनीता दहिफळे, वंदना जगनाडे, बाळासाहेब जाधव आणि प्रतिभा नेवकर यांचा गौरव करण्यात आला. विशेष पुरस्काराने पूजा कदम आणि सुनिला दिवाणे यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक – माध्यमिक विभाग या पुरस्काराने कविता पाचरणे, नसिफा शेख, अपर्णा चिंचोलकर, रुपाली गाथा, दामहे नूतनलाल आणि विद्या मिसाळ यांचा गौरव करण्यात आला. खासगी विभागातील आदर्श शिक्षक पुरस्काराने मनीषा कलशेट्टी आणि विजयश्री काजळे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मनपा व संस्था संचलित शाळांमधील आदर्श शिक्षक पुरस्काराने सुप्रिया पाटील आणि गोकुळ पवार यांचा गौरव करण्यात आला.
शैक्षणिक कामकाजासोबतच प्रशासन आणि शाळांच्या दैनंदिन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक जयमाला गावडे, सरस्वती भेगडे, प्रमिला जाधव, ज्योती तापकीर, सुजाता कर्जतकर, प्रमिला होले, श्रीकांत चौगुले, अंजली झगडे, खालेदा खान आणि सुनीता गिते यांना पुरस्कार देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत
पुरस्कार सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. पिंपळे गुरव शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळागौर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. रावेत शाळेतील शिक्षकांनी ‘बाई पण भारी देवा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या सादरीकरणातून दररोज कामावर जाणाऱ्या महिलांची व्यथा, त्यांचा संघर्ष आणि कुटुंबासाठी त्यांचे योगदान प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच थेरगाव शाळेतील शिक्षिका स्नेहल भोसले यांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून गणेश वंदना सादर केली. विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे पुरस्कार सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. तसेच कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते आणि करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले. त्यांनी बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांसमोरील करिअरच्या विविध संधी, योग्य करिअर निवड आणि भविष्यातील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण आणि मार्गदर्शनपर व्याख्यान यामुळे शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.










Total Users : 222778