शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रख्यात मराठी सुगम संगीत गायिका अनुराधा मराठे यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे फेस्टिव्हलतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते मंगळवारी पत्रकार भवन, नवी पेठ येथे हा सत्कार झाला. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे जनरल सेक्रेटरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, नगरसेवक सुनील शिंदे, मोहन टिल्लू आदी उपस्थित होते. यानिमित्ताने ज्येष्ठ निवेदिका मंजिरी धामणकर यांनी अनुराधा मराठे यांच्या प्रदीर्घ संगीत प्रवासावर आधारित प्रकट मुलाखत घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी यमन रागातील गणेशस्तवनाने केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘‘३८व्या पुणे फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात झाली आहे. अनुराधा मराठे यांचा सत्कार म्हणजे अखंड संगीतसाधनेचा सन्मान आहे. कलाकाराचा सन्मान हा केवळ त्या कलाकाराचा नसून संपूर्ण संगीत क्षेत्राचा सन्मान असतो. वय वाढते तसे कलाकाराची कला अनुभवातून अधिक समृद्ध होत जाते.’’
त्यानंतर अनुराधा मराठे यांनी आपल्या संगीत कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देताना गुरू, कुटुंब आणि दिग्गज संगीतकारांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे आपली जडणघडण झाल्याचे सांगितले.
मराठे म्हणाल्या, ‘‘माझ्या आई-वडिलांना गायनाची आवड होती. वडिलांच्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यामुळे आम्ही धुळ्यात स्थायिक झालो. वयाच्या सातव्या वर्षी डॉ. श्रीपाद नाईक यांच्याकडे पाच रुपये फी देऊन गायन शिकण्यास सुरुवात केली. मात्र, एका वर्षाने कुटुंबाच्या आग्रहामुळे गायन थांबले. त्यानंतर माझे गुरू स्वतः घरी आले आणि पुन्हा मला गायनासाठी घेऊन गेले. पुढे त्यांनी तब्बल १७ वर्षे कोणतीही फी न घेता मला उत्तम प्रकाराचे प्रशिक्षण दिले.’’
गायनासोबत चित्रकला आणि नाटकाचीही आवड होती. मात्र, आईने ‘‘नाटक लग्नानंतर करता येणार नाही; पण गायन करता येईल,’’ असा सल्ला दिला. त्यामुळे गायनाची साधना सुरू ठेवली. गुरूंनी रियाजाचे महत्त्व मनावर बिंबवले. ‘‘सहा तास सराव केला तरच तीन तास व्यवस्थित गाता येते,’’ हा गुरूंचा मंत्र आयुष्यभर उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आवडती बंदिश ‘लाज शरम तो को नाही…’ सादर केली. बंदिशीतील शब्द स्पष्ट असणे, सूर-तालाची जाण आणि बारकाव्यांवर लक्ष देणे यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. गुरूंनी गायनासोबत तबलाही शिकवला. ‘‘सूर आणि ताल हे एकत्र असतात. मात्र, आजच्या संगीतात त्यांच्यातील हा समतोल वेगळा जाणवतो,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. नव्या पिढीतील गायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण ‘पलट्या’ हे यूट्यूब चॅनेल सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
वयाच्या १६व्या वर्षी संगीत मैफलींना सुरुवात झाली. पुण्यात आल्यानंतर जानुरीकर सरांकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी गायन ऐकून सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची संधी मिळावी यासाठी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे नेण्याचे सांगितले होते. मात्र, पुढील काळात दोन मुलींच्या बाळंतपणामुळे पुढे गायनाला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यानंतर वाटवे अण्णांकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतले.
‘‘मला मोठ्या कलाकारांकडून गायनाची दिशा मिळाली. त्यातून विविध अनुभव घेत तब्बल ९१ संगीतकारांसोबत गाण्याची संधी मिळाली. प्रत्येक संगीतकाराकडे काहीतरी वेगळेपण असते आणि ते शिकून घेतले पाहिजे,’’ असे मराठे म्हणाल्या. जयदेवजी यांच्यासमोर गायन केल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजात लता मंगेशकर यांच्या गायनाची झलक असल्याचे सांगत ‘रामायण’साठी गाण्याची ऑफर दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी ‘पिया घर आये रे सजनी’, ‘मोरा अचल मैलारी’ तसेच ‘सखी बघ अघटीत घडले…’ या रचना सादर केल्या.
माणिकबाई वर्मा बहुस्पर्शी गायिका पुरस्कार हा आपल्याला मिळालेला पहिला पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘ते एका गाण्यासाठी सुमारे ३० चाली लावत आणि त्यातून योग्य चाल निवडत. तीन मिनिटांचे गाणे असले तरी त्याला सर्वस्व दिले पाहिजे, असे ते सांगत.’’
लता मंगेशकर यांच्यासमोर ‘तरुण आहे रात्र अजून’ हे गाणे सादर केल्यानंतर मिळालेली शाबासकी हा आपल्यासाठी भारतरत्न मिळाल्यासारखा अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. आशा भोसले यांनीही ‘ज्ञानेश्वरी’च्या गायनावेळी गाण्यातील बारकावे सहजपणे शिकवल्याची आठवण त्यांनी सांगितली.
अभिजात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वरस्थाने आणि ताल पक्के करणे आवश्यक आहे, असे अनुराधा मराठे यांनी सांगितले. ‘‘गाणे आत्मसात करून त्याला प्रतिभेची जोड दिली पाहिजे आणि सातत्याने गात राहिले पाहिजे,’’ असा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मंजिरी धामणकर यांनी केले.




Total Users : 238563