spot_img
spot_img
spot_img

जे आर डी आणि रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे अध्वर्यू! – सचिन ईटकर

टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

पिंपरी (दिनांक : १२ सप्टेंबर २०२६) ‘भारतरत्न जे आर डी आणि उद्योगमहर्षी रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे अध्वर्यू आहेत!’ असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन ईटकर बोलत होते. टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी स्पार्क इंजिनिअर्सच्या संचालिका डाॅ. सुनीता पाटसकर यांना (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार), बी पी मेटाटेक एल एल पीचे संचालक प्रवीण माळी यांना (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगरत्न पुरस्कार), ज्योती हीटसिंक्स ॲण्ड एन्क्लोजर्सचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब गुंजाळ यांना (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगविभूषण पुरस्कार), मेणार ऑटो काॅम्पोनंट्सचे संचालक तानाजी बाबर यांना (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगभूषण पुरस्कार), एस ॲण्ड पी इंजिनिअर्सचे संस्थापक प्रशांत ढवळे यांना (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगभूषण पुरस्कार) आणि विकास इंडस्ट्रीजच्या संचालिका वैशाली ढवळे यांना (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगसखी पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सचिन ईटकर पुढे म्हणाले की, ‘आपल्या नफ्यातील ऐंशी टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी देणारा टाटा उद्योगसमूह हा भारतातील एकमेव उद्योगसमूह आहे. या समूहाने भारताच्या विकासाचा पाया रचला असून त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या विकसनशील देशात अनेक उद्योजक रोजगारनिर्मिती करीत आहेत!’ मनोहर पारळकर यांनी, ‘उद्योग चालविणे ही तारेवरची कसरत असते; कारण यश समाजाला दिसते; पण त्यामागील कष्ट सहसा जाणवत नाहीत. उद्योग क्षेत्रातील विश्वासार्ह अन् यशस्वी तरुणाई पाहून महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्य आहे, याची खात्री वाटते!’ असा विश्वास व्यक्त केला.

कुमार खोंद्रे यांनी सादर केलेल्या पिंपरी – चिंचवडच्या लावणीने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि कामगारांप्रति बांधिलकी या दोन निकषांवर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी हितगुज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता डाॅ. सुनीता पाटसकर यांनी आपल्या भूमीतला अन् मातीचा सन्मान खूप महत्त्वाचा वाटतो, असे नमूद केले. प्रवीण माळी यांनी उद्योगात यंत्रमानवाचा वापर अपरिहार्य असल्याचे सांगितले. बाळासाहेब गुंजाळ यांनी चाकोरीबाहेर जाऊन अंतराळ क्षेत्राशी संबंधित उद्योगाची उभारणी केल्याची माहिती दिली. तानाजी बाबर यांनी सधन शेतीपेक्षा उद्योगाला प्राधान्य दिल्याचे आणि प्रशांत ढवळे यांनी पत्नीच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग उद्योगासाठी करीत असल्याची तर वैशाली ढवळे यांनी पतीचे आपल्या उद्योगावरील अपत्यवत प्रेम पाहून पतीपश्चात जिद्दीने उद्योग पुढे नेल्याची हृद्य भावना व्यक्त केली. अरुण गराडे, जयश्री श्रीखंडे, बाजीराव सातपुते, महेंद्र भारती, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, प्रतिमा काळे, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर, स्वाती भोसले यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!