पुनर्वसनाची जागा आधी नागरिकांना दाखविण्याची लोक जनशक्ती पार्टीची मागणी
पिंपरी-चिंचवड : बालाजीनगर SRA प्रकल्पाचा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी SRA पुणे व पिंपरी-चिंचवडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची भेट घेऊन निवेदन दिले.
श्री. बालाजी अपेक्स बिल्ड एलएलपी यांच्याकडून बालाजीनगर SRA प्रकल्पाचा प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. हा प्रस्ताव पुढे नेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
SRA प्रकल्पामुळे नागरिकांचे पुनर्वसन ज्या ठिकाणी होणार आहे, ती जागा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी नागरिकांना प्रत्यक्ष दाखवावी. तसेच पुनर्वसनाची जागा बालाजीनगरपासून जास्तीत जास्त दोन किलोमीटरच्या परिसरात असावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रकल्पाची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळावी यासाठी SRA संदर्भातील पॅम्पलेट, ब्रोशर आणि माहिती पुस्तिकांचे वाटप करावे. त्यानंतर नागरिक, SRA अधिकारी आणि संबंधित विकासक यांची संयुक्त बैठक घेऊन नागरिकांच्या शंका व सूचना जाणून घ्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या हिताचा विचार करूनच पुनर्वसनाचे काम संबंधित संस्थेला देण्यात यावे, अशी भूमिका लोक जनशक्ती पार्टीने मांडली.
यावेळी सेरबानू शेख, राजाभाऊ धीमधीमे, मारुती काळे, रंजना राजगुरू, प्रसाद गायसमुद्रे, ज्ञानेश्वर पोटे, राजेंद्र उजगरे, अजर सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.










Total Users : 221669