spot_img
spot_img
spot_img

“रस्ते-गटार सफाई निविदेवर ‘रिंग’चा संशय! संदीप वाघेरे आक्रमक; फेरनिविदेसह चौकशीची आयुक्तांकडे मागणी”

निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रशासनाकडे निवेदन; सार्वजनिक निधी व पारदर्शकतेच्या दृष्टीने चौकशीची मागणी

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात रस्ते व गटार सफाईच्या कामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत निविदादारांमध्ये संभाव्य संगनमत अथवा ‘रिंग’ झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने, सदर निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने खुल्या, पारदर्शक व व्यापक स्पर्धात्मक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सदर निविदा प्रक्रिया आज पूर्ण झाल्यानंतर वाघेरे यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले. या निविदांना मोठा आर्थिक आवाका असून त्याचा थेट संबंध महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीशी तसेच शहराच्या स्वच्छता व्यवस्थेशी आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया केवळ तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होणे पुरेसे नसून ती वास्तविक, खुली आणि निष्पक्ष स्पर्धेतून पार पडली आहे का, याची खातरजमा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने निविदादारांमध्ये परस्पर संगनमत होऊन ‘रिंग’ निर्माण झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने निविदा प्रक्रियेत अपेक्षित व वास्तविक स्पर्धा झाली आहे किंवा नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे उपलब्ध निविदा अभिलेख, निविदादारांची माहिती, आर्थिक बोलींचे स्वरूप आणि इतर संबंधित निदर्शकांची स्वतंत्र व वस्तुनिष्ठ पद्धतीने छाननी करण्याची मागणी वाघेरे यांनी केली आहे.

निविदादारांचे समान पत्ते, संपर्क क्रमांक, ई-मेल, अधिकृत प्रतिनिधी, समान कागदपत्रांची रचना अथवा मजकूर, डिजिटल/तांत्रिक निदर्शक तसेच परस्पर व्यावसायिक संबंध यांची नियमानुसार तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आर्थिक बोलींमध्ये असामान्य साम्य, पूर्वनियोजित स्वरूपाच्या बोली अथवा कृत्रिम स्पर्धेचे कोणतेही संकेत आढळतात का, याचीही पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुढील कार्यवाही थांबविण्याची मागणी
सदर निविदा प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयाची वस्तुनिष्ठ पडताळणी पूर्ण होईपर्यंत, निविदा मंजुरी, स्वीकृती अथवा पुढील कार्यादेशासंबंधीची कार्यवाही लागू नियमांच्या अधीन राहून स्थगित ठेवण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने विचार करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

चौकशी किंवा छाननीदरम्यान वास्तविक व व्यापक स्पर्धा झालेली नसल्याचे अथवा निविदादारांमध्ये संगनमत झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यास, लागू शासन नियम व ई-निविदा प्रक्रियेतील तरतुदींनुसार सदर निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

‘विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होऊ नये’
नव्याने निविदा काढताना निविदेतील अटी व शर्ती कोणत्याही विशिष्ट कंत्राटदारास अथवा मर्यादित गटास अनुकूल ठरणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच निविदेला व्यापक प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त पात्र व स्वतंत्र निविदादारांचा सहभाग वाढविण्यात यावा, जेणेकरून महानगरपालिकेला स्पर्धात्मक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दर मिळू शकतील, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

“कोणत्याही विशिष्ट निविदादाराविरुद्ध आरोप करणे हा आमचा उद्देश नसून, महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीचे संरक्षण, वास्तविक स्पर्धा, पारदर्शकता आणि निविदा प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. निविदा प्रक्रियेबाबत गंभीर संशय निर्माण झाला असल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनातून मांडली आहे.

महानगरपालिकेच्या मोठ्या आर्थिक दायित्वाशी संबंधित असलेल्या या निविदा प्रक्रियेबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक छाननी करावी आणि प्रक्रिया संशयास्पद आढळल्यास ती रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरनिविदा काढावी, अशी आगृही मागणी त्यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!