पुणे श्रमिक पत्रकार भवनात स्पर्धा परीक्षार्थ्यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी ‘एमपीएससी’च्या कारभारावर आणि पेपर फुटण्याच्या प्रकारांवर थेट भाष्य केले.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा एक पेपर फुटला, मग बाकीचे पेपर फुटले नसतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येतो आहे, त्यातून नकारात्मकता वाढीस लागत आहे. व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे हे सिद्ध होते आहे, ते आम्ही सुद्धा मान्य करतो, अशी कबुली आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या समस्या पाचपुते यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एमपीएससीची भरती प्रक्रिया, उमेदवारांच्या समस्या, राज्य सरकारच्या उपाययोजना अशा मुद्द्यांवर पाचपुते यांनी भाष्य केले.
पाचपुते म्हणाले, सद्यस्थितीत संवादाचा अभाव आहे. सरकारचा घटक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे, दारे उघडत असल्यास दारे तोडण्याची गरज नाही. काही प्रश्न गाजावाजा न करता मार्गी लावले आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांसमोर त्यांच्या समस्या मांडाव्यात. भरती प्रक्रिया, परीक्षांतील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. स्पर्धा परीक्षार्थ्यांनी या समितीसमोर त्यांच्या समस्या, सूचना नोंदवल्या पाहिजेत.
स्पर्धा परीक्षांबाबत काही समस्या गंभीर आहेत, त्या सरकारही नाकारत नाही. गैरप्रकारांबाबत कोणतेही पुरावे असल्यास ते उपलब्ध करून द्यावेत. सरकार व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुधारणा करण्याची सरकारचीही मानसिकता आहे. आता कडू गोळी घ्यायची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहिले पाहिजे. नकारात्मक वातावरणाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम थांबवणे महत्त्वाचे आहे.
रोहित पवार यांनी पुरावे यंत्रणेला द्यावेत
रोहित पवार यांनी पुरावे आहेत असे सांगून केवळ आरोप करण्यापेक्षा पुरावे यंत्रणेला द्यावेत. त्यानुसार पुढील तपास करता येईल. स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी वेळप्रसंगी रोहित पवार यांच्याबरोबर येण्यासही तयार आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.
राजीनामा द्यायचा की नाही, हा अध्यक्षांचा अधिकार
एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवण्याची राज्यघटनेनुसार एक प्रक्रिया आहे. राजीनामा द्यायचा की नाही हा अध्यक्षांचा नैतिक अधिकार आहे. अध्यक्षांवर दबाव टाकता येणार नाही, असे पाचपुते यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षार्थ्यांचे म्हणणे काय?
स्पर्धा परीक्षार्थ्यांनी पाचपुते यांच्याशी झालेल्या संवादात परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षांना होणारा विलंब यासह विविध मुद्दे उपस्थित केले. एमपीएससीबाबतचे प्रश्न केवळ आम्हीच उपस्थित करायचे का, पुरावेही आम्हीच द्यायचे का? एमपीएससी स्वायत्त संस्था म्हणून अपयशी ठरत आहे, त्यांच्या निर्णयाची माहिती आधीच समाजमाध्यमांत कशी काय पसरते? विद्यार्थी आणि आयोग यांच्यात संवादाचा अभाव आहे. आयोगानेच संवाद निर्माण केल्यास नेत्यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधत फिरण्याची गरज नाही, असे विद्यार्थ्यांनी नमूद केले.










Total Users : 221408