spot_img
spot_img
spot_img

मा. उपमहापौर शैलजाताई मोरे यांच्याकडून सलग दुसऱ्या दिवशी शहरातील स्मशानभूमींच ‘ग्राऊंड ऑडिट’..

ताथवडे, चिखली, नेहरुनगर आणि मोरवाडीतील वास्तुस्थितीची केली पाहणी..

महापालिका प्रशासनाच्या दप्तरदिरंगाई कारभाराची केली पोलखोल..

पिंपरी चिंचवड (दि. ०९) :- नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या कारभारातील गंभीर त्रुटी आता मृतांना अखेरचा निरोप देण्याच्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्या आहेत. ताथवडे, चिखली (टाळगाव), नेहरुनगर आणि मोरवाडी येथील स्मशानभूमींच्या पाहणीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, स्वच्छता, प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्था आणि कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य अशा अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे काही ठिकाणी कचरा व गवताचे साम्राज्य, तर काही ठिकाणी विद्युत दाहिनी बंद असल्याचे आढळून आल्याने महापालिका प्रशासन नेमके करते तरी काय, असा प्रश्न माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी पाहणीदरम्यान उपस्थित केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना, माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिकेच्या सभागृहात हा प्रश्न ठामपणे उपस्थित करून प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे यांनी केवळ सभागृहात आवाज उठवण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरून शहरातील स्मशानभूमींची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला.

या पाहणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी मोरे यांनी मोरवाडी, नेहरुनगर, टाळगाव-चिखली आणि ताथवडे येथील स्मशानभूमींना भेट देत तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध ठिकाणी आढळून आलेल्या अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणीही नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी भावना मोरे यांनी व्यक्त केली. नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यविधी करता यावा यासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाला केली.

ताथवडे स्मशानभूमी : सहा कामगार, रात्री मात्र एकच कामावर..

ताथवडे स्मशानभूमीत सहा कामगार कार्यरत असतानाही रात्रीच्या वेळी केवळ एकच कामगार ड्युटीवर असतो, अशी धक्कादायक बाब समोर आली. कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यांना आवश्यक सुरक्षा किटही देण्यात आलेले नाही. नदीतून बाहेर येताना अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेली लोखंडी ग्रीलची सुरक्षितताही उपलब्ध नाही. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप मोरे यांनी केला.

चिखली (टाळगाव) : स्वच्छतागृहाभोवती घाणीचे साम्राज्य…

चिखली (टाळगाव) स्मशानभूमीत कामगारांसाठी स्वतंत्र खोलीची सुविधा नाही. स्वच्छतागृहात पाण्याची सोय नसून परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. स्वच्छतागृहाभोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दररोज स्वच्छता केली जात नसल्याचे दिसून आले. कपडे बदलण्याच्या खोलीत पाणी साचलेले आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. नदीतून बाहेर पडताना पायऱ्यांवर सुरक्षिततेसाठी ग्रील नसल्याने येथेही नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले, असे मोरे म्हणाल्या.

नेहरुनगर : कार्यालयातच मद्यप्राशन; विद्युत दाहिनी बंद..

नेहरुनगर स्मशानभूमीच्या कार्यालयात काही जण मद्यप्राशन करत असल्याचे आढळले, तर इतर कर्मचारी गैरहजर होते. विद्युत दाहिनी बंद अवस्थेत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असून काही ठिकाणी ते दोन ते अडीच फूट उंचीपर्यंत पोहोचले आहे. हात-पाय धुण्याच्या ठिकाणी घाण साचलेली आहे. सभामंडपात स्वच्छतेचा अभाव आहे. विद्युत दाहिनीला एकच जाळी असून दुसरी जाळी अद्याप बसविलेली नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचा फिल्टर आणि चेंजिंग रूम बंद आहेत. येथे सुविधा तर नाहीतच, पण सुरक्षिततेचीही पुरेशी व्यवस्था नसल्याचे यांनी सांगितले.

मोरवाडी : सहा महिन्यांपासून धुराची चिमणी बंद…

मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यविधीनंतर पाय धुण्यासाठी असलेल्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. परिसरात कचरा साचलेला असून बाजूला दोन ते अडीच फूट उंचीचे गवत वाढलेले आहे. विद्युत दाहिनीला केवळ एकच जाळी आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे धुराची चिमणी मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याचे मोरे यांनी सांगितले. स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नसून कामगारांना सुरक्षा किटही देण्यात आलेले नाही. त्यामुळे आवश्यक सुरक्षासाहित्याविना कामगारांना उपलब्ध परिस्थितीतच काम करावे लागत असल्याची खंत मोरे यांनी व्यक्त केली.

मोशी स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव..

मोशी येथील स्मशानभूमीची पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आणि मूलभूत सुविधांचा अभाव आढळून आला. पाहणीच्या वेळी स्मशानभूमीत एकही कामगार उपस्थित नव्हता, तर एका ठिकाणी चिता जळत असतानाही आवश्यक सोलर व विद्युत व्यवस्था उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतागृह बंद स्थितीत, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र रूम नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, परिसरात चिखल व कचरा साचलेला आहे. नदीकाठावरून वर येताना असलेल्या पायऱ्यांनाही सुरक्षेसाठी ग्रील नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच चितेच्या धुरासाठी आवश्यक चिमणी बसविण्याची गरज असल्याचेही स्पष्ट झाले. परिसरात दारूड्यांचा उच्छाद असल्याने सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पाहणीवेळी नगरसेविका सारिका गायकवाड उपस्थित होत्या. संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता, “सदर कर्मचारी परस्पर मला न सांगता निघून गेला आहे,” असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे मृतांना अखेरचा निरोप देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या या स्मशानभूमीतील सुविधांचा आणि प्रशासनाच्या देखरेखीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उत्तरदायित्वाची जबाबदारी कोणाची ?…

स्मशानभूमी ही नागरिकांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील क्षणाशी संबंधित जागा आहे. अशा ठिकाणी स्वच्छता, पाणी, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, विविध स्मशानभूमींमधील ही परिस्थिती पाहता देखभाल, नियमित पाहणी आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा अभाव आहे. आता प्रशासन या गंभीर त्रुटींवर तातडीने उपाययोजना करणार का, की स्मशानभूमींची ही दुरवस्था अशीच सुरू राहणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!