कृष्णानगरमध्ये वेलींनी गुदमरलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून प्रशासनाला जाब; मारुती गणपत जाधव आक्रमक
पिंपरी-चिंचवड : कृष्णानगर येथील सचिन गृह संकुल आणि सेंट अँन स्कूलच्या शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरची अत्यंत धोकादायक अवस्था समोर आली आहे. ट्रान्सफॉर्मरभोवती मोठ्या प्रमाणात वेलींचे साम्राज्य निर्माण झाले असून, संपूर्ण विद्युत यंत्रणा अक्षरशः वेलींनी झाकून गेली आहे. त्यामुळे *“हा ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?”* असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे *मारुती गणपत जाधव* यांनी महावितरण आणि महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात वेली आणि झाडाझुडपांचा विळखा वाढत असतानाही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, *शाळेच्या अगदी शेजारीच हा ट्रान्सफॉर्मर असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची या परिसरातून ये-जा होते.* अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत यंत्रणा वेलींनी झाकलेली असणे ही गंभीर सुरक्षेची बाब असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
“एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का?”
“बिजलीनगरसारखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? ट्रान्सफॉर्मरमधून करंट उतरून एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल मारुती गणपत जाधव यांनी उपस्थित केला.
*दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा आणि चौकशी करण्यापेक्षा आधीच धोकादायक परिस्थिती दूर का केली जात नाही?* असा सवालही त्यांनी केला.
बॅनर लावून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जाधव यांनी घटनास्थळी *“ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?”* अशा आशयाचा बॅनर लावून महावितरण आणि महापालिका उद्यान विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध केला.
विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर लोकप्रतिनिधींचे कार्यालय असतानाही इतक्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का झाले, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. *नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा राजकीय सोयी महत्त्वाच्या आहेत का?* असा थेट प्रश्न जाधव यांनी प्रशासनाला केला.
वेली हटवा, विद्युत यंत्रणेची तपासणी करा
ट्रान्सफॉर्मरवरील सर्व वेली तातडीने हटवाव्यात, परिसराची साफसफाई करावी, विद्युत यंत्रणेची तांत्रिक तपासणी करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.
*“प्रशासनाने आता तरी जागे व्हावे. नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी धोकादायक परिस्थिती दूर करा. दुर्घटनेनंतर पंचनामा करण्याची वेळ येऊ देऊ नका,”* असा इशाराही जाधव यांनी दिला.
दरम्यान, शाळेच्या परिसरातच धोकादायक अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर असल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.










Total Users : 221174