शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील कृष्णानगर परिसरात सेंट अन्स स्कूलजवळील विद्युत ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात वेली वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब, इन्सुलेटर आणि विद्युत वाहिन्यांभोवती वेलींचा विळखा पडला असून, “हा ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वेली वाढत असतानाही महापालिकेच्या उद्यान विभागाकडून तसेच महावितरणकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक ११ मधील कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी केला आहे.
विद्युत उपकरणांजवळ वाढलेल्या या वेली अत्यंत धोकादायक ठरू शकतात. एखाद्या नागरिकाचा किंवा लहान मुलाचा चुकून या भागाशी संपर्क आल्यास विद्युत प्रवाहामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः अलीकडेच बिजलीनगर परिसरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
“दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने खबरदारी घ्यावी,” अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.
कृष्णानगरमधील सेंट अन्स स्कूल शेजारील ट्रान्सफॉर्मरवरील सर्व वेली तातडीने हटवाव्यात आणि परिसराची सुरक्षितता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास महानगरपालिकेत निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मारुती गणपत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक ११ यांनी दिला आहे.










Total Users : 220869