पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
बावधन येथील मुंबई-बंगळुरू महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रकला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी डिव्हायडरला घासून ट्रकला धडकली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता सीएनजी पंपाच्या पुढे, मुंबई लेन, अॅव्हेन्यू सोसायटी, बावधन परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान झाकीरहुसेन शेख (वय २२, रा. आगाशीव नगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) हा त्याच्या ताब्यातील एमएच १२ एनझेड २१४६ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अथर्व कुलकर्णी (वय २२) हा मागे बसला होता.
पहाटेच्या वेळी महामार्गावरून जात असताना फरहान याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. समोरून जाणाऱ्या ट्रकला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी डिव्हायडरला घासली आणि त्यानंतर ट्रकला धडकली. धडकेनंतर दुचाकीस्वार व त्याचा मित्र रस्त्यावर खाली पडले. दुचाकी काही अंतर घासत गेल्याने तिचेही मोठे नुकसान झाले.
या अपघातात फरहान शेख गंभीर जखमी झाला. या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी अथर्व पद्माकर देशमाने (वय २३, व्यवसाय नोकरी, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे) यांच्या फिर्यादीवरून बावधन पोलीस ठाण्यात दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री १०.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, ११९/१७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पहाटेच्या वेळेत महामार्गावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.










Total Users : 220526