पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
जुनी सांगवी येथे दहीहंडी उत्सवासाठी उभारलेले लोखंडी स्ट्रक्चर कोसळून सलमा सलाउद्दीन पठाण (५२) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. मंडप व लोखंडी स्ट्रक्चर उभारण्याची जबाबदारी असलेला मेहबूब उर्फ सॅम रमजान शेख (२७) तसेच स्पीकर साऊंड सिस्टम उपलब्ध करून देणारा कुणाल अनिल भोगावडे (२९) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या विघ्नहर्ता मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल धर्मराज बेलदार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर स्ट्रक्चर उतरविताना आवश्यक ती सुरक्षितता न बाळगल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी फिर्याद देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी स्वतःहून (सुओ-मोटो) गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










Total Users : 220535