शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १८, मौजे चिंचवड येथील नदीलगतच्या १८ मी. रुंद रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश भोईर यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
चिंचवडगाव परिसरातील नदीलगतचा हा रस्ता गेल्या काही काळापासून अविकसित अवस्थेत होता. रस्त्याची पातळी योग्य नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर घसरून नागरिक पडण्याच्या घटना घडत होत्या. तसेच रस्ता लेव्हलमध्ये नसल्यामुळे लहान चारचाकी वाहनांच्या खालील भागाचा रस्त्याला घास लागून वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या समस्येची दखल घेत नगरसेवक सुरेश भोईर यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

रस्त्याची सद्यस्थिती, नागरिकांची गैरसोय आणि वाहनचालकांना निर्माण होणारा धोका याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होण्याची अपेक्षा आहे. रस्त्याची योग्य पातळी निश्चित करून तो वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात घसरणे, वाहनांना अडथळे निर्माण होणे तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे.
“नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी भूमिका नगरसेवक सुरेश भोईर यांनी व्यक्त केली.
नगरसेवक सुरेश भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे चिंचवडगावातील नदीलगतच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




Total Users : 224186