५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस; क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीत नशामुक्तीचा संकल्प
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील मानाची आणि पारंपरिक दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या दहीहंडीचा थरार यंदाही चिंचवडगावात पाहायला मिळाला. चित्तथरारक कसरती आणि थरांच्या स्पर्धेनंतर मुंबईतील चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकाने’ मानाची दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकावला.
चिंचवडगावातील श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाच्या ‘शिवोदय’ पारंपरिक ढोल-ताशा पथकाच्या दमदार वादनाने दहीहंडी महोत्सवाची सुरुवात झाली. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदांचा उत्साह आणि उपस्थित तरुणाईच्या जल्लोषामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
मुंबई येथील हरे कृष्णा हरे रामा गोविंदा पथक, चेंबूरचे शितलादेवी गोविंदा पथक तसेच गोवंडी येथील लुंबिनीबाग गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी चित्तथरारक कसरती सादर केल्या. गोविंदांनी एकापेक्षा एक उंच थर रचत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. अखेर चेंबूरच्या शितलादेवी गोविंदा पथकाने यशस्वी सलामी देत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
विजेत्या शितलादेवी गोविंदा पथकाला उत्सवाचे संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने स्मृतीचिन्ह आणि ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, ‘ब’ प्रभाग समिती सभापती मंदार देशपांडे, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका मनीषाताई चिंचवडे तसेच भाजपा ज्येष्ठ नेते पै. ज्ञानेश्वर आप्पा शेडगे यांच्या हस्ते विजेत्या पथकाचा गौरव करण्यात आला.
या दहीहंडी महोत्सवाला सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. अभिनेत्री क्रांती रेडकर यांना पाहण्यासाठी चिंचवडमधील तरुणाईने मोठी गर्दी केली होती.
दहीहंडीच्या उत्साहात नशामुक्तीचा संकल्प
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेचा संदेश. DCP Zone-1 यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी अभियान राबविण्यात आले. सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीत नागरिकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत ढवान यांनी नशामुक्ती अभियानासोबतच सायबर सुरक्षेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करत शपथ दिली. त्यामुळे पारंपरिक दहीहंडी उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड मिळाली.
या कार्यक्रमास टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ भाजपा नेते पै. ज्ञानेश्वर शेडगे, समितीचे मार्गदर्शक दत्ताभाऊ चिंचवडे, रवींद्र देशपांडे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, युवा नेते हेमंत डांगे, पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे, भाजपा उपाध्यक्ष कैलास सानप, कामगार नेते हरीभाऊ चिंचवडे, चिंचवडगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच विठ्ठलभाऊ सायकर, महेश मिरजकर, महेश लांडगे, आवेश चिंचवडे, चेतन चिंचवडे, योगेश चिंचवडे, सुनील लांडगे, राघूशेठ चिंचवडे, नंदूकाका भोगले, मनीष पंजाबी, राजन पाटील, अख्तर पिंजरी, लतीफ मुलानी, महेश कंद, योगेश मिरजकर, विशाल भोईर, महेश गावडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर बच्चे आणि नंदू भोगले यांनी केले. उत्सव यशस्वी करण्यासाठी दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.




Total Users : 224588