पिंपरी-चिंचवड : देहू-आळंदी रस्ता, कुरुळी, मोशी, निघोजे, भारतमाता चौक, तळवडे तसेच चिखलीतील भोई चौक परिसरातील औद्योगिक रस्त्यांवर दररोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हजारो कंपन्यांमध्ये लाखो कामगार कार्यरत असून, त्यांच्या ने-आण करण्यासाठी धावणाऱ्या खासगी कंपनी बसच वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक सेलचे शहर अध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे यांनी याबाबत वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांकडे निवेदन देऊन खासगी कंपनी बससाठी निश्चित थांबे आणि पिकअप पॉइंट निश्चित करण्याची मागणी केली आहे.या वेळी वाहतूक संघटनेचे कार्यअधयक्ष अकबर शेख , पदवीधर सेल अध्यक्ष प्रदिप आवटी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते
निवेदनानुसार, सकाळी ६.३० ते ९ आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ८ या गर्दीच्या वेळेत मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये कंपनी बस थांबविल्या जातात. अनेक बस चालक कामगारांची वाट पाहण्यासाठी चौक, वळण तसेच मुख्य रस्त्यावरच बस उभ्या करतात. त्यामुळे मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प होते.
देहू-आळंदी रस्ता, मोशी-चाकण मार्ग, निघोजे-कुरुळी रस्ता तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर दररोज शेकडो बस रस्त्यावर उभ्या राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर बस पार्क केल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय बसमध्ये चढण्यासाठी अनेक कामगार घाईघाईने रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
कंपन्यांच्या आवारात बस पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक बस रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत असतानाही काही बस चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्याची तक्रार आहे.
त्यामुळे खासगी कंपनी बससाठी स्वतंत्र आणि निश्चित थांबे, पिकअप पॉइंट तसेच पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी विनोद वरखडे यांनी केली आहे. या उपाययोजनांमुळे औद्योगिक परिसरातील नागरिक, वाहनचालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.





Total Users : 215453