पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
माण परिसरात जमिनीचा काही भाग बळकावण्याच्या उद्देशाने पत्र्याचे कंपाऊंड ढकलून बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी १५ ते १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास मौजे माण, सर्व्हे क्रमांक ३७, ता. मुळशी येथे घडली. याप्रकरणी पार्थ मोहन रिसवडकर (वय ३४, रा. औंध, पुणे) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली.
आय.व्ही. रेड्डी, गणेश माने, कुलदीप पाटील यांच्यासह १० ते १५ अनोळखी इसमांनी मिळून जमिनीचा काही भाग बळकावण्याच्या उद्देशाने दोन जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याच्या कंपाऊंडचा काही भाग ढकलून पाडला. तसेच बांधकामाचे फाऊंडेशन व ब्रिकवर्क पाडून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान केले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरेही तोडण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुरक्षा रक्षकांनी तोडफोडीला विरोध केला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केली. या मारहाणीत सुरक्षा रक्षक तानाजी पवार जखमी झाले. तसेच आरोपी गणेश माने व कुलदीप पाटील यांनी फिर्यादीच्या भावाच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली आणि फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.




Total Users : 226697