spot_img
spot_img
spot_img

वेल्हे पोलिसांची कारवाई; सराईत चोरटा अटकेत, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील घेवंडे गावात फॉर्महाऊसच्या बांधकाम साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत चोरट्याला वेल्हे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश बबन मरगळे असे आहे. त्याच्याकडून आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घेवंडे गावच्या हद्दीत अॅड. सुरज ननवरे यांच्या फॉर्महाऊसचे बांधकाम सुरू असून, तेथे आणून ठेवलेले सुमारे ८८ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्यांनी ९ ऑगस्ट रोजी रात्री चोरी करून नेले होते. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिस हवालदार गजानन खत्री यांना संशयित चोरटे पुन्हा चोरीच्या उद्देशाने घेवंडे गावात येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी गावात गस्त वाढवली. त्यावेळी फॉर्महाऊस परिसरात एक पिकअप टेम्पो संशयास्पदरीत्या दोन-तीन वेळा फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आला. टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता वेल्हेच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून पिकअप टेम्पो अडविला.

यावेळी टेम्पोमध्ये बसलेले दोन संशयित डोंगरातील झाडाझुडपांचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, चालक रमेश बबन मरगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईत आतापर्यंत सुमारे ३.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या चौकशीतून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी आणि वेल्हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देखमुख, पोलीस हवालदार गजानन खत्री, सोमेश राऊत तसेच पोलीस अंमलदार युवराज सोमवंशी, बुद्धीवान मोरे, अजिंक्य बंडगर, आकाश पाटील, मयूर जगताप, शुभम कदम व सोमनाथ जाधव यांच्या पथकाने केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!