spot_img
spot_img
spot_img

हॉकी झारखंड, हरियाणाची विजयी सलामी; विभाग ‘अ’मध्ये आघाडी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विभाग ‘अ’च्या पहिल्याच दिवशी हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणाने दमदार विजय मिळवत आपापल्या गटात विजयी सुरुवात केली. दरम्यान, गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेश हॉकी आणि मणिपूर हॉकी यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

विभाग ‘अ’च्या गट ‘अ’मध्ये हॉकी झारखंडने हॉकी चंदीगडचा तब्बल ६-० असा एकतर्फी पराभव केला. झारखंडकडून पुष्पा डांगने २०व्या आणि ४४व्या मिनिटाला दोन गोल केले. होरो एस्तेर, मुंदरी सरोज, जमुना कुमारी आणि संगीता कुमारी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

गट ‘ब’मध्ये हॉकी हरियाणाने हॉकी बंगालचा १०-१ असा धुव्वा उडवला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक गोलफरकाचा विजय ठरला. हरियाणाकडून अंजनीने तीन, कौर सुखप्रीत आणि खासा शशी यांनी प्रत्येकी दोन, तर भाव्या, खुशी आणि दीक्षा यांनी प्रत्येकी एक गोल केला. बंगालकडून जाडिया साल्मीने एकमेव गोल केला.

गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेश हॉकी आणि मणिपूर हॉकी यांच्यात चुरशीची लढत झाली. उत्तर प्रदेशच्या पटेल वंदनाने २०व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर त्याच मिनिटाला मणिपूरच्या हुड्रोम बिद्यालक्स्मी देवीने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

दरम्यान, विभाग ‘ब’मध्ये हॉकी दिल्लीने आसाम हॉकीचा ६-० असा पराभव केला. दिल्लीकडून निशा, बिंदिया केरकेट्टा, राणा निशू, दीपिका, तनिषा एक्का आणि लकडा नम्रता यांनी प्रत्येकी एक गोल केला.

हॉकी उत्तराखंडने हॉकी युनिट ऑफ तामिळनाडूचा ३-१ असा पराभव केला. उत्तराखंडकडून आरती, उपाध्याय काशिश आणि मुक्ता यांनी गोल केले, तर तामिळनाडूकडून प्रियदर्शिनी के. हिने एक गोल केला.

शनिवारी झालेल्या सामन्यात हॉकी बिहारने गोअन्स हॉकीचा ६-० असा पराभव केला. खुशी कुमारीने तीन, सिद्धी कुमारीने दोन आणि कुमारी अंजलीने एक गोल केला.

रविवारच्या सामन्यानंतर विभाग ‘ब’च्या गट ‘ब’मध्ये हॉकी कर्नाटक ९ गुणांसह आघाडीवर आहे. हॉकी उत्तराखंड ७ गुणांसह दुसऱ्या, हॉकी बिहार ४ गुणांसह तिसऱ्या आणि हॉकी तामिळनाडू ३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. गोअन्स हॉकीला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

ही स्पर्धा हॉकी महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली आणि हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्टेट बँक प्रस्तुत प्रायोजक असून, युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर असवानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला सपोर्ट पार्टनर्स आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!