शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त तसंच ‘दादा उद्योगिनी’ व ‘NCP Youth’ App च्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त पुण्यात अतिशय भावनिक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला बचत गटांच्या माता-भगिनी, महिला उद्योजिका, कारागीर, पत्रकार आणि युवा मित्रांचं मनापासून स्वागत केलं.
पुणे हे महिला शिक्षणाची सुरुवात आणि युवकांच्या स्वप्नांना आकार देणारं शिक्षण, उद्योग व स्टार्टअप्सचं केंद्र असल्यानं या कार्यक्रमासाठी पुण्यापेक्षा योग्य जागा नाही, असं स्पष्ट केलं.
आज केवळ उपमुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्ष म्हणून नव्हे, तर एक महिला, आई, बहीण, सून आणि आपल्या सर्वांची वहिनी म्हणून उभी असल्याची भावना व्यक्त केली. आदरणीय अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही; मात्र तुमच्या डोळ्यांत पाहिल्यावर रडण्याचं नाही, तर लढण्याचं बळ मिळतं, अशी भावना व्यक्त केली.
‘दादांना अश्रू आवडत नव्हते, त्यांना काम आवडायचं. मी कामाचा माणूस आहे,’ असं ते नेहमी म्हणायचे. त्यांनी दिलेला विकासाचा वारसा पुढे नेणं आणि त्यांनी पाहिलेलं प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं.
दादांचा विश्वास होता की महिला सक्षम झाली की कुटुंब, समाज आणि राज्य सक्षम होतं. महिला सक्षमीकरण म्हणजे आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता. याच दृष्टिकोनातून ‘दादा उद्योगिनी’ची संकल्पना पुढे आली आहे.
राज्यात साडेसहा लाखांहून अधिक महिला बचत गट आणि सुमारे ६५ लाख महिला सदस्य विविध उत्पादनं व सेवा तयार करत आहेत. त्यामुळं प्रश्न अधिक उत्पादनाचा नसून अधिक चांगल्या पद्धतीनं विक्री करण्याचा आहे. महिलांची उत्पादनं स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, नवीन ग्राहक व ऑर्डर्स मिळवणं आणि व्यवसाय वाढवणं हे ‘दादा उद्योगिनी’चं उद्दिष्ट आहे. केवळ अधिक उत्पादनं नव्हे, तर अधिक यशस्वी महिला उद्योजिका घडवणं हे ध्येय असल्याचे स्पष्ट केले.
युवकांसाठी ‘NCP Youth App’ हा कौशल्यवृद्धी, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधींमधील डिजिटल दुवा ठरेल. नोकरी, कौशल्य, प्रशिक्षण, मूल्यांकन, मुलाखत आणि रोजगार या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील योग्य संधींसाठी तयार करून योग्य नियोक्त्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण, कौशल्य, मार्गदर्शन, रोजगार आणि आत्मनिर्भरता हाच शिक्षण व संधी यांच्यातील खरा दुवा आहे, असं स्पष्ट केलं.
महाराष्ट्राच्या दोन महान शक्ती म्हणजे निर्मिती करणारे आपल्या महिला आणि महाराष्ट्राची उभारणी करणारे आपले युवक. त्यांच्या प्रतिभेला योग्य संधी मिळणं ही आपली जबाबदारी आहे. अजितदादांचा दृष्टिकोन केवळ आठवण म्हणून नाही, तर कृतीतून पुढे घेऊन जात आहोत, अशी भावना व्यक्त केली.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विकासकामांचा आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हा पक्षाचा आत्मा असून सर्वधर्मसमभाव, प्रगत आणि पुरोगामी विचारांवर कायम राहून राज्याच्या विकासाचा मुद्दा घेऊन पक्ष वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘दादा उद्योगिनी’ आणि ‘NCP Youth’ या दोन्ही ॲपमुळे राज्यातील महिला आणि युवकांना आपलं भविष्य घडवण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.




Total Users : 239154