spot_img
spot_img
spot_img
spot_img

पवना धरण १००% भरले, तरी १५% पाणी कपात कायम; मनसेचा आंदोलनाचा इशारा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात लागू असलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नागरिकांना पूर्ण दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा ४८ तासांत निर्णय न झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०१८-१९ पासून पिंपरी-चिंचवडकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्था सहन करावी लागत आहे. सुरुवातीला ही व्यवस्था केवळ सहा महिन्यांसाठी तात्पुरती असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र सात ते आठ वर्षे उलटूनही शहरवासीयांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

काही दिवसांपूर्वी पवना धरणातील जलसाठा १५ ते २० टक्क्यांवर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र सध्या मुसळधार पावसामुळे पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. असे असतानाही पाणी कपात कायम ठेवल्याने शहरातील अनेक सोसायट्या, निवासी संकुले आणि बैठ्या घरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मनसेने निवेदनाद्वारे १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करणे, शहरात पूर्ण क्षमतेने आणि पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करणे तसेच सिंचन विभाग आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये प्रभावी समन्वयाची यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

दरवर्षी धरण पूर्ण भरल्यानंतर लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच पाणी कपात मागे घेतली जाते, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने ४८ तासांत निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र लोकआंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!