शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर गावठाण येथील प्राथमिक शासकीय दवाखान्याची पाहणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे आणि नगरसेविका कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने संदीप विठ्ठल काटे यांनी दवाखान्याला भेट देत तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी दवाखान्यातील औषधसाठ्याची उपलब्धता, आवश्यक औषधांची कमतरता, इमारतीची दुरुस्ती व डागडुजी, स्वच्छता, तसेच रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी औषधांचा नियमित पुरवठा, आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
यावेळी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच प्राधान्य असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.



