spot_img
spot_img
spot_img

६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेचा पिंपरी-चिंचवडमध्ये १६ नोव्हेंबरपासून रंगणार नाट्यजल्लोष!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पिंपरी-चिंचवड केंद्रावर १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या स्पर्धेतील नाट्यप्रयोग रंगणार असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण २७ नाट्यसंस्था आपापल्या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करणार आहेत.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहभागी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली असून, कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक अंतिम तयारीसाठी मेहनत घेत आहेत. स्पर्धेतील नाट्यप्रयोग दोन सत्रांत सादर होणार असून, पहिला प्रयोग दुपारी १२.३० वाजता, तर दुसरा प्रयोग सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. ही स्पर्धा १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे.

हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवरील कलाकारांना आपली कला, कल्पकता आणि प्रयोगशीलता प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी मिळते.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी सुरू आहे.

नाट्यरसिकांना वेगवेगळ्या आशयांचे, विचारांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. सध्या सहभागी नाट्यसंस्थांकडून संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे.

या स्पर्धेच्या पिंपरी-चिंचवड केंद्राचे समन्वयक म्हणून राजेंद्र बंग, तर सहसमन्वयक म्हणून पंकज चव्हाण काम पाहत आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक रंगकर्मी आणि नाट्यसंस्था उत्साहाने सहभागी होत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच परिसरातील नाट्यरसिकांनी या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांच्या कलाविष्काराला दाद द्यावी आणि त्यांच्या कलाप्रवासाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!