शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत, तसेच केंद्रीय गृहमं त्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रचारमाध्यमांमध्ये आणि राजकीय सूत्रांकडून विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात असून, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, फडणवीस यांची दिल्लीतील संभाव्य नियुक्ती झाल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील राजकीय समीकरणे, आगामी धोरणात्मक निर्णय आणि केंद्रीय नेतृत्वाची भूमिका लक्षात घेता महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही वरिष्ठ नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दिल्लीतील बैठकीनंतरच केंद्र सरकारच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दिल्लीतील घडामोडींवर लागले आहे.


