तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, स्त्रीरोग, बालरोग व दंतोपचार सेवा; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील नागरिकांसाठी शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक संस्था हॉल, नव महाराष्ट्र शाळा, पिंपरी येथे होणार आहे. आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि नागरिकांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी तसेच दातांच्या समस्यांवरील तपासणी व मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध राहणार आहेत. तपासणीसाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महाआरोग्य शिबिराचे आयोजन नगरसेविका निकिताताई अर्जुन कदम, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका प्रियांका कुदळे आणि नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
आयोजकांनी पिंपरी परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची वेळेवर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.



