spot_img
spot_img
spot_img

भोसरी एमआयडीसीत वाढत्या चोऱ्या, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 भोसरी एमआयडीसी परिसरात अलीकडच्या काळात कंपन्यांमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवर अपुरी प्रकाशव्यवस्था असल्यामुळे औद्योगिक परिसराच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो कामगार आणि शेकडो महिला कर्मचारी दररोज ये-जा करत असलेल्या या औद्योगिक क्षेत्रात अंधाराचे प्रमाण वाढल्याने उद्योजक, कामगार आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पाहणीत असे निदर्शनास आले आहे की, अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. काही ठिकाणी दिवे सुरू असले तरी त्यांची उंची, प्रकाशक्षमता किंवा दिशा योग्य नसल्याने प्रकाश थेट रस्त्यावर न पडता केवळ खांबाभोवती किंवा झाडांच्या फांद्यांमध्येच अडकतो. अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे प्रकाश पूर्णपणे झाकला जात असून प्रत्यक्ष रस्ता अंधारात राहतो. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली प्रकाशव्यवस्था अपेक्षित उद्देश साध्य करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

परिसरातील काही अंधारमय भागांबाबत अनधिकृत मद्यविक्रीच्या तक्रारी तसेच मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तींच्या वावराची माहिती उद्योग क्षेत्राकडून पुढे येत आहे. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना भीतीच्या वातावरणातून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
विद्युत विभाग आणि उद्यान विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पथदिव्यांची देखभाल, बंद दिव्यांची दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी वेळेत होत नसल्याचे दिसून येते. परिणामी अंधाराची समस्या अधिक तीव्र होत आहे.
इंडस्ट्रीज असोसिएशनने महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे की, एमआयडीसीतील सर्व बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, विद्यमान प्रकाशयोजनेचे तांत्रिक ऑडिट करून ज्या ठिकाणी प्रकाश रस्त्यावर पडत नाही तेथे उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसवावेत, झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी करावी आणि संपूर्ण औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र प्रकाशव्यवस्था सुधारणा आराखडा तयार करावा.
तसेच, एमआयडीसीतील सर्व प्रमुख चौक, संवेदनशील रस्ते आणि चोरीप्रवण भागांमध्ये उच्च क्षमतेचे हायमास्ट दिवे बसविण्यात यावेत. अशा प्रकाशव्यवस्थेमुळे चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना स्पष्ट दृश्य उपलब्ध होईल, संशयित व्यक्ती व वाहनांची ओळख पटविणे सुलभ होईल तसेच चोरी, गुन्हेगारी आणि असामाजिक कृत्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. यासोबतच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
भोसरी एमआयडीसी हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असून येथे हजारो उद्योग, कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री आणि मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. उद्योजक नियमितपणे कर भरत असताना त्यांना सुरक्षित आणि प्रकाशमान औद्योगिक परिसर उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. विद्यमान पथदिवे असूनही प्रकाश रस्त्यावर पोहोचत नसेल तर त्या संपूर्ण प्रकाशयोजनेचे तांत्रिक पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. महानगरपालिका, विद्युत विभाग, उद्यान विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कृती आराखडा तयार करून तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!