नागरिकांच्या तक्रारीची आयुक्तांकडे दखल; अनधिकृत भंगार साठ्यांवर कारवाईचे आदेश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी परिसरातील विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेजवळ वारंवार प्लास्टिक, टायर व इतर भंगाराला आग लावून निर्माण होणाऱ्या तीव्र वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा प्रा. कविता संदेश आल्हाट यांनी नागरिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेत महापालिका प्रशासनाकडे आक्रमक पाठपुरावा केला.
विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील महिलांनी प्रा. कविता संदेश आल्हाट यांची भेट घेऊन परिसरातील प्रदूषणाबाबत निवेदन सादर केले. त्यानंतर त्यांनी तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. तसेच महापौर रवी भाऊ लांडगे यांचीही भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई, अनधिकृत भंगार साठे हटविणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
या वेळी मा. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे उपस्थित होते.

प्रा. कविता संदेश आल्हाट यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ संयुक्त पाहणी करण्याचे, अनधिकृत भंगार साठे हटविण्याचे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
याबाबत प्रतिक्रिया देताना प्रा. कविता संदेश आल्हाट म्हणाल्या, “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. मोशी परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळावे, यासाठी माझा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. प्रशासनाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होईपर्यंत मी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”


