पिंपरी-चिंचवड : मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात आणून टाकला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, भीमशक्ती नगर आणि मोरे वस्ती या दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत असून दुर्गंधी, माशा, डास आणि वाढते प्रदूषण यामुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात शाळा, रुग्णालये तसेच हजारो नागरिकांची वस्ती असल्याने संसर्गजन्य आजार आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोशी येथील दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने लोकवस्तीच्या मध्यभागी नवीन कचरा संकलन केंद्र उभारण्यास सुरुवात केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी प्रशासनाने तातडीने हा कचरा इतर सुरक्षित ठिकाणी हलवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
मारुती जाधव यांनी पुढे सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार तात्काळ थांबविणे आवश्यक आहे. याप्रकरणी लवकरच मा. उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.



