शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
भोईर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी असून निष्पाप नागरिकांच्या जिवाशी झालेला हा गंभीर खेळ आहे. दुर्घटनेतील सर्व पीडित व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण पूर्ण संवेदनांनिशी सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भोईर यांनी सांगितले की, ते ७ जुलै २०२६ पासून पूर्वनियोजित कामानिमित्त राज्याबाहेर असल्याने दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. याबाबत संबंधित नागरिकांची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही परिस्थितीवर आणि मदतकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले.
सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, लष्कर तसेच इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही नागरिकांचे प्राण अजूनही सुरक्षित असण्याची शक्यता असल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याचे सांगत सर्व यंत्रणांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भोईर यांच्या प्रमुख मागण्या –
- दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत
- कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची सखोल चौकशी करावी
- पीडित कुटुंबांना योग्य न्याय व भरपाई द्यावी
- कचरा डेपो व्यवस्थापन व सुरक्षेची पुनर्रचना करावी
- दोषींना पाठीशी घालू दिले जाणार नाही
- शहरात परतल्यानंतर वैयक्तिक आढावा घेणार
अशा गंभीर प्रसंगी राजकारण करण्यापेक्षा बचाव यंत्रणांना सहकार्य करणे आणि बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
ही घटना केवळ वरवरची चौकशी करून चालणार नसून, याला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्ती व यंत्रणेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. दोषींना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय आणि पीडितांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संपूर्ण कचरा डेपोच्या व्यवस्थापनाची आणि सुरक्षेची नव्याने पुनर्रचना करण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.


