spot_img
spot_img
spot_img

अल्ला देवे, अल्ला दिलावे…” अभंगाच्या संदेशाने दुमदुमली वारी

वारकऱ्यांच्या सेवेत हिंदू-मुस्लिम एकत्र; पुण्यात मानवतेचा आदर्श

शबनम न्यूज , पुणे प्रतिनिधी :
पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त पुण्यातून मार्गक्रमण करणाऱ्या हजारो वारकरी बांधवांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या एका अनोख्या उपक्रमाने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हृदयस्पर्शी संदेश दिला. पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट आणि सामाजिक उद्धार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आयोजित या सेवाभावी उपक्रमात पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशीद खान, सामाजिक उद्धार संस्थेचे अध्यक्ष सिराज खान, सत्तार शेख, तसेच जमीयतुल अन्सार ट्रस्टचे उपाध्यक्ष जाफर शेख, शाहिद शेख, सिद्दीक शेख, गौस शेख, चांद शेख आणि चामडे गल्लीतील मुस्लिम युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी संततुकाराम महाराज
यांच्या अभंगातील “अल्ला देवे, अल्ला दिलावे…” हा समतेचा, बंधुभावाचा आणि मानवतेचा संदेश उपस्थितांसमोर मांडण्यात आला.

आयोजकांनी स्पष्ट केले की, या उपक्रमामागील उद्देश कोणताही धार्मिक भेदभाव नसून हिंदू-मुस्लिम एकता, सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याची खरी शिकवण वारीतून मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचे वारकरी बांधवांसह नागरिकांनी मनापासून स्वागत केले. “वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजाला जोडणारी संस्कृती आहे. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे ऐक्य आणि सौहार्द अधिक बळकट होते,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

आषाढी वारीच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रेरणादायी आदर्श ठरला असून, मानवतेचा संदेश देणाऱ्या या प्रयत्नाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!