शबनम न्यूज | प्रतिनिधी
रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांचे जनजीवन ठप्प झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू असले तरी सलग दोन ते तीन दिवस वीज नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज संबंधित परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे अधिकारी श्री. शिवाजीराव गायकवाड आणि श्री. विश्वनाथ लहाणे उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची माहिती देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत स्पष्टीकरण दिले.
गेल्या काही दिवसांपासून वाकड,ताथवडे,पुनावळे,मामुर्डी,रावेत आणि किवळे या भागांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा परिणाम वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, सोसायट्यांमधील लिफ्ट सेवा तसेच आपत्कालीन सेवांवर होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
राहुल कलाटे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधील हा परिसर सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असलेला भाग असून, येथे मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांचा आजचा रोष पाहता भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी महावितरण व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ही समस्या वरिष्ठ पातळीवर मांडली जाणार असून, त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
दरम्यान, वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.



