spot_img
spot_img
spot_img
spot_img

ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेतील ११ लाख झाडांवर कुऱ्हाड नको, पोलिसांसाठी पर्यायी जागेचा विचार करा

शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाढत्या प्रदूषणामुळे ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील वळुमाता प्रक्षेत्रातील शासकीय जागेवर ११ लाख झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना हिरवाई अनुभवता येत असून नागरिकांना दिलासा मिळत आहे. त्यातच ही जागा पोलीस आयुक्तालयासाठी दिली. आयुक्तालयाच्या कामासाठी झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागेल. त्यामुळे येथीलच यशदासाठी दिलेल्या जागेपैकी  ५० एकर जागा पोलिसांसाठी द्यावी अशी विनंती खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सुमारे ५० एकर जागेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुकालय उभारण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय घेताना या परिसरातील पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता व मोठ्या प्रमाणावर असलेली वृक्षसंपदा यांचा पुरेसा विचार झालेला दिसून येत नाही. या परिसरात हुंदाई कंपणीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत वनराई संस्थेमार्फत सुमारे ११ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही जागा पूर्वापार शेतीची असल्यामुळे तेथे अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक व जुने वृक्ष अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून बांधकाम अथवा मैदान विकसित करणे हे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य ठरेल. शहरातील हरित क्षेत्र टिकविणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.
‘यशदा’ला दिलेली जागा आयुक्तालयाला देण्याचा पर्याय 
पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक गावात गायरान जागा उपलब्ध आहे. त्यामुळे ही जागा पोलीस आयुक्तालयासाठी वापरण्यात यावी अथवा यापूर्वी राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी (यशदा) यांना ७५ एकर जागा ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची जागा दिली आहे. आत्तापर्यंत ८ ते १० वर्षात त्यांनी जागेचा वापर केला नाही .यातील ५० एकर जागा पोलीस आयुक्तालयासाठी उपलब्ध करून देता येऊ शकते. त्यामुळे विद्यमान वृक्षसंपदा अबाधित राहील आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल. यशदाने ही जागा महामेट्रोला भाडेतत्त्वावर दिली आहे. 
जागेचे व्यवस्थापन महापालिकेकडे सोपवावे
पशुसंवर्धन विभागाची शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली सुमारे ६७ हेक्टर जागा ही पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची कायम ठेवून तिची देखभाल व व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवावी. त्या ठिकाणी शहरासाठी भव्य सेंटर पार्क’ विकसित करण्यात यावे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हरित खुली जागा उपलब्ध होईल. पर्यावरण संवर्धनास चालना मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक वारसा जतन करता येईल. या परिसरात ऑक्सिजन भरपूर प्रमाणात तयार होईल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. त्या परिसरातील वृक्षांची वस्तुनिष्ठ मोजणी करावी, पर्यावरण तज्ज्ञांचे मत तसेच स्थानिक नागरिकांचे जनमत विचारात घेऊनच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे. 
पोलीस आयुक्तालयाला जागा देण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, या जागेवर ११ लाख झाडांची लागवड केली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे झाडांची मोठी आवश्यकता आहे.  यशदाला दिलेल्या जागेपैकी ५० एकर जागाआयुक्तालयासाठी देण्याचा विचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
श्रीरंग बारणे, खासदार

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!