पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
जाधववाडी परिसरात सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या बांधकामादरम्यान शुक्रवारी अपघाताची घटना घडली. इमारतीच्या नवव्या मजल्यावर भिंतीचे बांधकाम सुरू असताना भिंतीचा काही भाग अचानक कोसळून शेजारील निवासी इमारतीच्या गॅलरीत पडला.
या घटनेत बांधकामावर काम करणारा एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने भिंतीचे अवशेष गॅलरीत पडले असताना तेथे कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू असून नुकसान आणि अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.



