spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

भोसरी औद्योगिक पट्ट्यातील वारंवारच्या वीजखंडितीवर अखेर गंभीर चर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी औद्योगिक परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. ३० जून) भोसरी येथील महावितरण कार्यालयात पार पडली. उद्योगांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुरेश गवस आणि निस्सार सुतार उपस्थित होते.

महावितरणच्या वतीने नव्याने नियुक्त कार्यकारी अभियंता लहाने, आकुर्डी विभागाचे सहाय्यक अभियंता शिर्के, मोशी विभागाचे सहाय्यक अभियंता मोरे, तळवडे विभागाचे उपविभागीय अभियंता सरोदे, अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड, तसेच विभागीय अभियंते झोपे आणि हुलसुळकर उपस्थित होते. यावेळी नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांचे लघुउद्योग संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

बैठकीचे संचालन अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी केले. त्यांनी मागील महिन्यातील फीडरनिहाय वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांचा सविस्तर आढावा सादर केला. योग्य नियोजन आणि समन्वयामुळे काही भागांमध्ये वीजखंडितीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तळवडे विभागात अद्यापही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रातील वारंवारच्या वीजखंडितीमुळे उत्पादन प्रक्रिया, कामगारांचे नियोजन आणि उद्योगांचे आर्थिक नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती मांडली. विशेषतः तळवडे येथील ‘देवी इंद्रायणी’ फीडरवर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी तळवडे विभागाचे उपविभागीय अभियंता सरोदे यांना तातडीने आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच औद्योगिक क्षेत्राला दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणकडून अधिक प्रभावी नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले.

औद्योगिक विकासासाठी अखंडित वीजपुरवठा ही अत्यावश्यक बाब असल्याचे मत दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आले. भविष्यात अशा समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी महावितरण आणि लघुउद्योग संघटना यांच्यात नियमित समन्वय बैठका घेण्यावरही सहमती झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!