spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या विविध रुग्णालय व दवाखान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा विविध रुग्णालय व दवाखान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्रीम. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते, ह.भ.प. मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी येथे उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते तसेच तालेरा रुग्णालयात आमदार उमा खापरे ,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भोसरी रुग्णालय येथे महिला व बालकल्याण समिती सभापती राणीताई पठारे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, नगरसदस्य विराज लांडे, ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसदस्या भीमाताई फुगे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या व वायसीएम रुग्णालयात माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याशिवाय महापालिकेच्या इतर रुग्णालये व दवाखान्यांमध्ये स्थानिक माननीय नगरसदस्य व नगरसदस्या यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त आणि निरोगी भारत घडविण्याचा संकल्प करण्यात आला.

सदर मोहीम यशस्वीपणे पार पडण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, महाराष्ट्र शासन पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. राजश्री ढवळे, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे अधिकारी, एएनएम, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व वैद्यकीय विभागाचे इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पालकांशी संवाद साधत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याचे महत्त्व विषद केले. यापूर्वी पोलिओचे नियमित डोस घेतले असले, तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

११२३ केंद्रांवर २ लाख २७ हजार ९५३ बालकांचे पोलिओ लसीकरण

सदर मोहीम शहरातील ११२३ पोलिओ लसीकरण केंद्रांवर यशस्वीपणे राबविण्यात आली. महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके तसेच फिरत्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस दिले. या मोहिमेत ० ते ५ वर्षांखालील २,२७,९५३ बालकांना, तसेच ५ वर्षांवरील ३,६८३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांनीही मोलाचे योगदान दिले.

ज्या पालकांना आज आपल्या बालकाला पोलिओचा डोस देता आला नाही, त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ० ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणार आहेत. नागरिकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या बालकाचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!