spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत ‘संविधान हत्या दिन’निमित्त विशेष व्याख्यान: आणीबाणीच्या ५१ वर्षांनंतरही लोकशाही रक्षणाची शपथ

 

पिंपरी-चिंचवड: भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील २५ जून १९७५ हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस मानला जातो. याच दिवशी देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या काळातील काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे झालेली संविधानाची अवहेलना आणि लोकशाहीची झालेली गळचेपी, याचा इतिहास आजच्या तरुण पिढीला कळावा, या उद्देशाने पिंपरी येथील आर्य समाज कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘संविधान हत्या दिन’ आणि ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “२५ जून १९७५ रोजी तत्कालीन सरकारने सत्तेच्या हव्यासापोटी संविधानातील कलम ३५२ चा गैरवापर करून २१ महिने देशात आणीबाणी लादली. ‘मिसा’ कायद्याचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला गेला आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे दमन झाले. ही केवळ आणीबाणी नव्हती, तर ती लोकशाही आणि संविधानाची हत्या होती. त्यामुळे संविधानाचा आदर आणि लोकशाहीचे रक्षण करणे, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे परम कर्तव्य आहे.”
या व्याख्यानाला हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इतिहासातील ही भीषण वास्तवता समजून घेतानाच, लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्पही यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

या विशेष कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष शत्रूघ्न (बापू) काटे, ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे, कार्यक्रमाचे आयोजक माजी महापौर संजोग वाघेरे पाटील व अनिता वाळुंजकर, भटके विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष गणेश ढाकणे, शहर उपाध्यक्ष कैलास सानप, सचिव देवदत्त लांडे, माजी सरचिटणीस अजय पाताडे, आर्य समाज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या रेश्मा खुशलानी, मारुती सोनटक्के, गणेश वाळुंजकर आणि रवी पारधे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजोग वाघेरे यांनी केले, सूत्रसंचालन गणेश ढाकणे यांनी केले, तर आभार अनिता वाळुंजकर यांनी मानले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!