पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरीतील भाटनगर परिसरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी एका तरुणाला गांजा आणि एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह अटक केली आहे. या प्रकरणी पुरवठादारांसह चौघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून 2026 रोजी सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास भाटनगर येथील अंतर्गत रस्त्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी देवदास उर्फ सोन्या महेश मलकेकर (वय 26) याच्या ताब्यातून 324 ग्रॅम गांजा (एकूण वजन 334 ग्रॅम) तसेच सुमारे 1.01 ग्रॅम एमडी पावडर असा सुमारे 26 हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपीने गांजा एका महिला आरोपीकडून विक्रीसाठी मिळाल्याची, तर एमडी पावडर मोहसीन आणि निखील सरोदे यांच्या सांगण्यावरून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे करीत आहेत.


