पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तडीपार आदेशाचे उल्लंघन करून धारदार कोयता बाळगत पिंपरीतील गांधीनगर परिसरात वावरत असलेल्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय ऊर्फ बंटी बाबुराव कांबळे हा आरोपी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला होता. असे असतानाही कोणतीही परवानगी न घेता तो पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करून गांधीनगर झोपडपट्टी परिसरात फिरत होता. यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीररित्या धारदार लोखंडी कोयता आढळून आला.
सध्या शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


