पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
निगडी ट्रान्सपोर्टनगर येथून मुंबईकडे पाठविण्यात आलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या केबल मालाचा तब्बल १० लाख ५४ हजार रुपयांहून अधिक किमतीचा माल परस्पर अपहार केल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय रोड वेज प्रा. लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कार्यरत असलेला आरोपी अविनाश विजय चव्हाण याच्याकडे आयशर टेम्पो (एमएच-१४ केक्यू-३४७४) द्वारे निगडी ट्रान्सपोर्टनगर येथून मुंबईतील लोहार चाळ परिसरात फिनोलेक्स कंपनीचे केबल बॉक्स पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ५ ते ७ मे २०२६ दरम्यान सुमारे १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीच्या मालाचा अपहार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी विजय अशोकराव कुन्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.


