पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
भोसरी एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीसाठी पाठविण्यात आलेल्या स्क्रॅप मालापैकी सुमारे ७ टन मालाचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी (ता. खेड) येथील एस.बी.ए. मेटल अँड स्टील प्रा. लि. कंपनीकडून कोरस इंडिया लिमिटेड (पेफको फाऊंड्री डिव्हिजन), भोसरी येथे २०.३८० मेट्रिक टन सीआरसीए स्क्रॅप माल पाठविण्यात आला होता. या मालाची एकूण किंमत १० लाख ५८ हजार १२९ रुपये होती. मात्र, ट्रकमधील केवळ १३ मेट्रिक टन माल कंपनीत उतरविण्यात आला, तर उर्वरित सुमारे ७ मेट्रिक टन स्क्रॅप, अंदाजे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा माल, कंपनीत न उतरविता परस्पर अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादी अस्लम बशीर शेख (वय ४०, रा. थेरगाव) यांच्या तक्रारीवरून विकास मानिक लाटे (रा. देहुगाव) व संतोष लाटे (रा. मोशी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून एमआयडीसी भोसरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 227519