spot_img
spot_img
spot_img
spot_img

पोलिसांवर फायरिंग करणारा कुख्यात आरोपी अखेर जेरबंद; देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

दिघी परिसरात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यानंतर फरार झालेल्या आणि पोलिसांच्या पथकावर थेट गोळीबार करून निसटलेल्या कुख्यात आरोपीला अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर) असे आहे. शेखर जाधव याच्यावर राज्यभरात ७० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या फायरिंगच्या घटनेत शेखर जाधव व त्याचे तीन साथीदार सहभागी होते. या प्रकरणात खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

दरम्यान, १६ मे रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले असता आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर उसाच्या शेताचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीचा माग काढण्यासाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तांत्रिक तपासासह गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. पोलिसांनी नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत अनेक वेळा जाऊन तपास केला. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १४ जून रोजी सायंकाळी मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचण्यात आला.

सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शेखर जाधव याला शिताफीने ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!