प्रतिनिधी : युनूस खतीब पिंपरी-चिंचवड | पुणे
टीसीएस (TCS) कंपनीतील ४८ वर्षीय कर्मचारी अमित अभय ब्रह्मे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून, सुसाइड नोटच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ३(५) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित ब्रह्मे यांनी २ जून रोजी आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक सविस्तर सुसाइड नोट मिळाली असून त्यामध्ये आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींचा आणि घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
सुसाइड नोटमध्ये टीसीएसमध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अर्चना आणि श्वेता या दोन महिला सहकाऱ्यांवर वारंवार अपमान करणे, रागावणे तसेच प्रकल्पातील कामगिरीचे रेटिंग खराब करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, वडील आजारी असताना आणि पत्नी कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असताना रजा मंजूर करण्यासाठीही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचा उल्लेख नोटमध्ये करण्यात आला आहे.
याशिवाय, अमित ब्रह्मे यांनी त्यांचे मित्र विनोद पालिचा यांचाही सुसाइड नोटमध्ये उल्लेख केला आहे. विनोद पालिचा यांनी कंपनीकडे त्यांच्या विरोधात चुकीचे आणि दिशाभूल करणारे ई-मेल पाठवून बदनामी केल्याचा तसेच पोलिसांकडे खोट्या तक्रारी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एसीपी सुधाकर यादव यांनी सांगितले की, सुसाइड नोटमधील आरोपांच्या आधारे अर्चना, श्वेता आणि विनोद पालिचा या तिघांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मृत अमित ब्रह्मे यांच्या पश्चात कर्करोगाने ग्रस्त असलेली पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. हा गुन्हा ९ जून रोजी नोंदविण्यात आला असून सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे.




Total Users : 227552