पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मावळ तालुक्यातील सदुंबरे येथे दिवाणी वादातून एका व्यक्तीच्या घराला पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप अनंता गाडे (वय ४१, रा. सदुंबरे, ता. मावळ) आणि आरोपी गणेश अनंता गाडे (वय ४२) यांच्यात वडगाव न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे. या वादाच्या कारणावरून आरोपीने शनिवारी (दि. ७ जून) पहाटे साडेतीनच्या सुमारास फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा आरोप आहे.
आगीमुळे घराचा मुख्य दरवाजा, सोफासेट, लाकडी कपाट तसेच संपूर्ण विद्युत वायरिंग जळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, घरात अडकलेल्या संदीप गाडे यांनी प्रसंगावधान राखत किचनची खिडकी फोडून बाहेर पडल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.
“दिवाणी वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न” अशी चर्चा या घटनेनंतर परिसरात सुरू असून, या प्रकारामुळे सदुंबरे परिसरात खळबळ उडाली आहे.


