spot_img
spot_img
spot_img

चावी काढून वादाची ठिणगी; जाब विचारायला गेलेल्या भावंडांवर लोखंडी पाईपने हल्ला

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथे किरकोळ वादातून दोन भावांवर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एका युवकाच्या कानामागे गंभीर जखम होऊन सहा टाके पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी दत्तात्रय मोहीते (वय ३३) यांचे वडील दत्तात्रय मोहीते हे कोरेगाव फाटा येथे खरेदीसाठी गेले असता आरोपी भिमराव बाळू दोंद याने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेत शिवीगाळ केली व थप्पड मारल्याचा आरोप आहे.

या घटनेचा जाब विचारण्यासाठी बालाजी मोहीते व त्यांचा भाऊ सौरभ हे आरोपीच्या घरी गेले असता वाद अधिक चिघळला. त्यावेळी आरोपी भिमराव दोंद याने लोखंडी पाईपने हल्ला केला, तर त्याचा भाऊ नकूल दोंद यानेही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात बालाजी मोहीते यांच्या गालाला दुखापत झाली असून सौरभ मोहीते यांच्या उजव्या कानामागे गंभीर जखम होऊन सहा टाके पडले आहेत. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार होले करीत आहेत.

किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष थेट रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने कोरेगाव खुर्द परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!