पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथे मोटारसायकलच्या चावीवरून झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचला असून, दोन कुटुंबांमधील संघर्षात रॉड आणि लाकडी काठ्यांनी मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमराव बाळू दोंद (वय ३५, रा. दोंद वस्ती, कोरेगाव खुर्द) यांच्या वडिलांसोबत मोटारसायकलच्या चावीवरून झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून आरोपी बालाजी मोहीते आणि सौरभ मोहीते यांनी दोंद यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली.
यानंतर आरोपींनी हातातील लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने भिमराव दोंद यांना मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ नकूल दोंद यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत नकूल यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन कोपराजवळ फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही मार लागला आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेबाहेर आहेत.
विशेष म्हणजे, याच घटनेसंदर्भात दुसऱ्या बाजूनेही परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने कोरेगाव खुर्द येथील हा वाद अधिकच चिघळला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


