पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव एमआयडीसी परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नवलाख उंबरे गाव हद्दीतील जलशुद्धीकरण केंद्रासमोरील परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी रोडलगत झाडाखाली काही जण पैसे लावून तीनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 4 हजार 190 रुपये रोख रक्कम तसेच 50 पत्त्यांचे बंडल जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भिमराव राठोड, रविंद्र शिंदे, रामदास भेगडे, प्रसाद पवार आणि सचिन बिरामणे यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएसएस कलम 35(3) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


