पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत बेकायदा देशी दारूचा साठा बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खालुंब्रे गावातील पवार वस्तीच्या रस्त्यावर, आर.आर. चायनीजच्या पाठीमागील परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत संदीप करण पुण (वय ४४, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) याच्याकडून देशी दारूच्या १२० बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ५,७२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी संदीप शंकर सुखदाने (बक्कल क्र. १७१९), गुन्हे शाखा यांनी फिर्याद दिली आहे. कारवाईत पोलीस हवालदार पठारे (बक्कल क्र. १३९६) यांनी सहभाग घेतला.
खेड परिसरात अवैध मद्यविक्री आणि साठेबाजीविरोधात पोलिसांची मोहीम सुरू असून अशा बेकायदा धंद्यांवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


