पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
विषारी व भेसळयुक्त दारूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसायाच्या संपूर्ण साखळीवर आता संयुक्त प्रहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन विभागाने समन्वय साधत अवैध दारूविरोधात व्यापक मोहीम उघडण्याचे ठरविले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (५ जून) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत भेसळयुक्त दारू, हातभट्टी, अवैध दारू गाळणी केंद्रे आणि विक्रीच्या जाळ्यांविरोधात गुप्त माहितीची देवाणघेवाण वाढविणे, संयुक्त कारवाया राबविणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली.
अलीकडील विषारी दारू प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्क भूमिका घेतली असून, अवैध दारूच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक दुव्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस, उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
अवैध दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आता एकत्रितपणे मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आगामी काळात मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.


