पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
फेसबुकवर ‘सिनिअर सिटीझन पेन्शन कार्ड’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्याने पिंपरीतील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ९ लाख १६ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधून पेन्शन कार्ड मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून बँक खात्यांची माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या दोन खात्यांमधून वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार करून ९.१६ लाख रुपये लंपास केले.
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने संत तुकारामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आयटी अॅक्ट व बीएनएसच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.


