पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चिखली परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवीगाळ आणि मारहाण केल्यानंतर आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून पत्नीच्या डोक्यात मारल्याने ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा भुसारे (वय ३०) या आपल्या मुलांसह जेवणासाठी घरी जात असताना रोकडे वस्ती येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे पती राजू नामदेव भुसारे (वय ४०) हे दारूच्या नशेत तेथे आले. त्यांनी पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात वर्षा भुसारे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर चिखली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




Total Users : 227582